राजापूर तालुक्यातील परुळे येथे कौटुंबिक वादातून हाणामारी; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

राजापूर:तालुक्यातील परुळे जुवेवाडी येथे वडिलाेपार्जित घराच्या वादातून चुलत्यावर पुतण्याने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात पुतण्यासह तीन महिलांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी श्याम मुरलीधर सावंत (वय ५८, व्यवसाय कोच, रा. कुर्ला, मुंबई) यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून, ते मूळचे परुळे जुवेवाडी येथील रहिवासी आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्याम सावंत आणि आरोपी यांच्यामध्ये वडिलाेपार्जित घरावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू असून त्याबाबत न्यायालयात खटला प्रलंबित आहे. ८ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास श्याम सावंत हे आपली पत्नी संगिता आणि धाकटा भाऊ सुदाम यांच्यासह परुळे येथील मूळ घरी आले होते. यावेळी घरात वास्तव्यास असलेल्या आरोपींनी न्यायालयात सुरू असलेल्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारण्यासाठी अंगावर धावून जात गोंधळ घातला.

या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले असून, संशयित आरोपी दीपक श्रीराम सावंत (वय ३५) याने रागाच्या भरात स्टीलच्या बाटलीने श्याम सावंत यांच्या डाव्या गालावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यात श्याम सावंत यांना दुखापत झाली आहे. तसेच, आरोपींनी त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ‘बघून घेण्याची’ धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी ९ मार्च रोजी मध्यरात्री १:३९ वाजता गु.आर.नं. ५३/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे. यात दीपक सावंत याच्यासह कुटुंबातील अन्य तीन महिलांचा समावेश असून, भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ३५२, ३५१(१), ३५ आणि ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *