GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणच्या नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमध्ये १३ लाखांचा अपहार; दोन संशयितांवर गुन्हा दाखल

चिपळूण:शहरातील नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी या नामवंत पेढीमध्ये ग्राहकांकडून आलेली रोख रक्कम आणि क्युआर कोडद्वारे मिळालेले पैसे स्वतःच्या खात्यावर वळवून सुमारे १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.या संदर्भात नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीचे हेड मॅनेजर महेंद्र मधुकर शिंदे (वय ३३, रा. रत्नागिरी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ही फसवणूक सन २०२२ ते १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. या प्रकरणात सुमित संजय शिंदे (रा. कोंढे, शिंदेवाडी, चिपळूण) आणि सिमयंती गणेश तांबिटकर या दोन संशयितांची नावे समोर आली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी क्रमांक १ सुमित शिंदे याने दुकानाचे अधिकृत बिल बुक न वापरता स्वतःचे खासगी बिल बुक तयार केले होते. या बनावट बिलांवर आरोपी क्रमांक २ सिमयंती तांबिटकर हिच्या सह्या घेऊन नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरीमधील माल ग्राहकांना विकला जात असे. विक्री केल्यानंतर ग्राहकांकडून मिळणारी काही रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली जायची, तर उर्वरित रकमेसाठी सुमितने स्वतःचा क्युआर कोड तयार केला होता. ग्राहकांना हा क्युआर कोड स्कॅन करायला लावून त्याद्वारे मिळणारी रक्कम त्याने दुकानाच्या खात्यावर जमा न करता परस्पर स्वतःच्या बँक खात्यावर वळवली. अशा प्रकारे दीर्घकाळ सुरू असलेल्या या गैरप्रकारात पेढीची एकूण १३ लाख १६ हजार ५८७ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.हा प्रकार लक्षात आल्यानंतर पेढीच्या व्यवस्थापनाने कायदेशीर पाऊल उचलले असून ९ मार्च २०२६ रोजी या प्रकरणी चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गु.आर.नं. ६५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, या आर्थिक फसवणुकीत अजून कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Total Visitor Counter

3486543
Share This Article