खेड: तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘योजना ऑरगॅनिक्स’ या रासायनिक कंपनीत ग्राइंडरने नटबोल्ट कापण्याचे काम करत असताना एक कामगार भाजून गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ग्राइंडरच्या ठिणग्या उडून अचानक आगीचा भडका उडाल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामगार ग्राइंडरच्या साहाय्याने नटबोल्ट कापण्याचे काम करत असताना अचानक ठिणग्या उडून आग लागली. या अपघातात कामगाराचे हात, पाय आणि चेहरा मोठ्या प्रमाणावर होरपळला. कंपनी व्यवस्थापनाने तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक उपचारांसाठी त्याला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, कंपनी व्यवस्थापनाने हा अपघात घडल्यानंतर औद्योगिक सुरक्षा विभागासह स्थानिक पोलीस यंत्रणेला कोणतीही खबर दिली नसल्याची माहिती समोर येत आहे. अपघाताची माहिती दडवून ठेवल्याने कंपनीच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर आणि कामगारांच्या जीवावरील बेफिकिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची औद्योगिक सुरक्षा विभागाने आणि पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून होत आहे.






