रत्नागिरी : मजगाव परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात विहिरीत एक नर बिबट्या आढळून वनविभागाने त्याला सुरक्षितपणे पकडून नेले होते, मात्र आता पुन्हा एक बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, आज सकाळी एका गाईवर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना बिबट्या दिसला, मात्र कामगाराच्या तत्परतेमुळे हल्ला अपयशी ठरला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यावेळी दिसलेला बिबट्या मादी जातीचा असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.
दरम्यान, मझगावचे सरपंच फय्याज मुकादम यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यांनी शितलवाडी, बौद्धवाडी परिसरातील नागरिकांना एकट्याने फिरू नये, तसेच रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा असे आवाहन केले आहे. “कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा आपत्कालीन प्रसंगी त्वरित माझ्याशी संपर्क साधावा,” असेही त्यांनी सांगितले.
या सलग बिबट्या दर्शनामुळे गावात भीतीचे सावट पसरले असून वनविभागाने परिसरात गस्त वाढवण्याचे संकेत दिले आहेत.
रत्नागिरी : मजगावात पुन्हा बिबट्याचा वावर; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण







