रत्नागिरी: कोकण रेल्वेमार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने अहमदाबाद जंक्शन ते मंगळूरु जंक्शन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक स्पेशल ट्रेनच्या (क्रमांक ०९४२४/०९४२३) फेऱ्यांना जुलै २०२६ अखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या ट्रेनच्या वेळेत आणि रचनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रेन क्रमांक ०९४२४ ही अहमदाबाद जंक्शनवरून दर शुक्रवारी, म्हणजेच ३, १०, १७, २४ आणि ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी १६:०० वाजता सुटणार असून, ही ट्रेन दुसऱ्या दिवशी रात्री २१:०० वाजता मंगळूरु जंक्शन येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक ०९४२३ ही मंगळूरु जंक्शनवरून दर शनिवारी, म्हणजेच ४, ११, १८, २५ जुलै आणि १ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २२:३० वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे ०२:१५ वाजता अहमदाबाद जंक्शन येथे पोहोचेल.
या ट्रेनचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी एकूण २२ कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. यात २ टियर एसीचे २, ३ टियर एसीचे ४, स्लीपरचे १२, जनरलचे २ आणि एसएलआरचे २ असे एकूण २२ डबे जोडले जाणार आहेत. अहमदाबाद आणि रोहा दरम्यानच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही, मात्र मार्गातील महत्त्वाच्या स्थानकांवर या ट्रेनला थांबा देण्यात आला आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरत्कल या स्थानकांवर या गाडीला थांबा असेल. जास्तीत जास्त प्रवाशांनी या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
