खेड: तालुक्यातील परशुराम ते कांदोशीदरम्यान रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेची १० तोळे वजनाची सोन्याच्या दागिन्यांची बॅग हरवल्याचा प्रकार समोर आला आहे. कुळवंडी गावाजवळ रिक्षातून ही बॅग रस्त्यावर पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही बॅग परत करणाऱ्यास योग्य ते बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, परशुराम येथील रहिवासी संजय शांताराम टेरवकर हे आपल्या कन्येला घेऊन परशुरामहून कांदोशी येथे रिक्षाने प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना कुळवंडी गावाजवळ आल्यावर त्यांच्या कन्येच्या हे लक्षात आले की, दागिन्यांची बॅग त्यांच्यासोबत नाही. हा प्रकार लक्षात येताच तिला मोठा धक्का बसला. तिने तात्काळ ही बाब वडिलांना सांगितली.
यानंतर टेरवकर यांनी ज्या मार्गाने प्रवास केला, त्या मार्गावर बॅगेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना कोणताच सुगावा लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. टेरवकर कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, या बॅगेत १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.