GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा; पोलिसांच्या अनियमिततेमुळे नागरिक त्रस्त

Gramin Varta
29 Views

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने लक्ष देण्याची गरज

संगमेश्वर शहर /एजाज पटेल : संगमेश्वर हे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे व मध्यवर्ती ठिकाण असतानाही, संगमेश्वर चौकात वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या अनियमित कारभारामुळे येथे दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

या चौकात चारही दिशांना अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, अनेकदा नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे.रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहू ट्रक यांनाही या कोंडीचा फटका बसत असून, अत्यावश्यक सेवांवरही याचा गंभीर परिणाम होत आहे.वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांकडून सतत कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात असल्याने संपूर्ण परिसर दणाणून जात आहे. ध्वनीप्रदूषणात मोठी वाढ होत असून, स्थानिक रहिवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे चौकात पोलिस चौकी असतानाही येथे नियमित वाहतूक नियंत्रण होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नव्हे तर महामार्गालगत, अगदी नजरेसमोर पोलीस ठाणे असतानाही वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील इतक्या महत्त्वाच्या चौकात अशी अराजक व बेफिकीर परिस्थिती निर्माण होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक पोलिसांची नियमित नेमणूक, शिस्तबद्ध नियोजन आणि प्रभावी नियंत्रण तातडीने राबवले नाही, तर भविष्यात मोठे अपघात अटळ असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिक, वाहनचालक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. केवळ कागदी उपाययोजना नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण आणले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3199496
Share This Article