रत्नागिरी: जिल्ह्यात सोमवारी गौरी पूजनाचा सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. यावर्षी ओवसे असल्याने नवविवाहितांची सकाळपासून लगबग सुरू होती. ठेवणीतल्या साड्या विविध अलंकार घालून महिलांनी विधिवत गौरी पूजन करून गोडधोडाचा नैवेद्य अर्पण केला. गणेशोत्सवामुळे सध्या सर्वत्र उत्साह चैतन्याचे वातावरण आहे. घरोघरी आरती भजन अभिषेक श्री सत्यनारायण महापूजा असे विविध कार्यक्रम सुरू असतानाच रविवारी (३१) गौराईचे आगमन झाले. सोमवारी सर्वत्र गौरी पूजन करण्यात आले. पूजेसाठी नैवेद्य तसेच ओवशाची लगबग घरोघरी सुरू होती.
नवविवाहितांचे ओवसे पाच सुपात मांडण्याची प्रथा आहे. त्यानुसार सुपात विविध फराळाचे पदार्थ फळे फळभाज्या ठेवून गौरीसमोर ठेवण्यात आले. एक सूप माहेरी एक सुख सासरी व इतर सुपे नातेवाईक यांना देण्याची प्रथा आहे. पांढऱ्या कपड्यातून फळांनी भरलेली ओवशाची सुपे घेऊन महिलांनी प्रवास केला. त्यासाठी खास रिक्षा खासगी वाहनांचे बुकिंग केले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ओवसी देण्यासाठीची लगबग सुरू होती. सकाळपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे दुपानंतर गौरी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची नातेवाईक मित्रमंडळी पाहुण्यांकडे ये जा सुरू असल्यामुळे रात्रीपर्यंत रहदारी वाहनांची वर्ग सुरू होती गौरीपूजनामुळे फळे फराळाचे पदार्थ पेढ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर झाला.