जॉर्जियामधील तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून संपादन केली पदवी
रत्नागिरी: जिद्द, कठोर परिश्रम आणि पालकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचे बळ यातूनच यश मिळते, याचे उत्तम उदाहरण रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील एका मुलीने घालून दिले आहे. मजगाव येथील माहिगीर मोहल्ल्यातील नमिरा परवेज टेमकर हिने वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) संपादन करून आपल्या मोहल्ल्यातून पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
तिच्या या यशाने केवळ कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे नाव उंचावले आहे. मजगावच्या माहिगीर मोहल्ल्यात अनेक युवक-युवती उच्च शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातून कोणीही पुढे आले नव्हते. अशा परिस्थितीत, याच मोहल्ल्यातील रहिवासी आणि उर्दू शाळेतून शिक्षण घेतलेले परवेज टेमकर यांनी आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते. गावातील आणि परिसरातील गरीब रुग्णांची सेवा करता यावी, या उदात्त हेतूने त्यांनी नमिराला जॉर्जियामधील तिब्लिसी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी पाठवले. नमिरानेही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत ८१ टक्के गुणांसह ही पदवी संपादन केली.
नमिराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मजगाव माहिगीर मोहल्ला जमातीकडून तिचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. या समारंभात, जमातीचे प्रतिष्ठित सदस्य बशीर सोलकर, इक्बाल मजगावकर, इम्तियाज फणसोपकर, अनिस होडेकर, अब्दुल अझीझ मजगावकर, इब्राहिम होडेकर, सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ इबजी, हुसैन टेमकर, मौलवी अबीदिन मुकादम यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमिराच्या यशाने मोहल्ल्यातील इतर तरुण-तरुणींनाही प्रेरणा मिळाली असून, या सत्कार समारंभातून तिचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मच्छिमार मोहल्ला जमातीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. नमिरा टेमकर हिने मिळवलेले यश हे केवळ तिच्या एकटीचे नसून, संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद क्षण आहे.