रत्नागिरी, चिपळुणातील परमिट रूम, बार, हॉटेल्स बंद राहणार?
रत्नागिरी : राज्य शासनाच्या दारू विक्रीवरील करवाढ धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील परमिट रूम, बार व हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येत 14 जुलै रोजी राज्यव्यापी बंद ची घोषणा केली आहे. चिपळूण येथील विविध संघटनांनी या बंदला पाठींबा दिला असून सोमवारी शहरासह तालुक्यातील सर्व बार, बिअर शॉपी, परमिट रूम, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.
दारूवरील व्हॅटमध्ये दुप्पट वाढ, परवाना शुल्कात 15 टक्क्यांची वाढ, तसेच उत्पादन शुल्कात तब्बल 60 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने संपूर्ण हॉटेल व बार उद्योग आर्थिक अडचणीत आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आहार संघटना मुंबई तसेच राज्यातील सर्व जिल्हा हॉटेल संघटनांच्या पुढाकाराने हे आंदोलन हाती घेण्यात आले आहे. या बंदला चिपळूण तालुका बिअर बार परमिट रूम हॉटेल असोसिएशनने पूर्ण पाठींबा दर्शवला आहे. तालुक्यातील सर्व हॉटेल व्यावसायिक सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत आपले व्यवसाय बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तसेच प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या आंदोलनाबाबत संघटनेचे अध्यक्ष किशोर रेडीज, उपाध्यक्ष सुहास चव्हाण, सचिव प्रथमेश कापडी व खजिनदार मिलिंद गोंधळी यांनी संयुक्त पत्रकाद्वारे माहिती दिली. यामध्ये त्यांनी नमूद केले की, राज्य शासनाने लादलेली आर्थिक करवाढ परवडणारी नसून अनेक हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे हजारो कामगार बेरोजगार होतील. शासनाने त्वरीत निर्णय मागे घ्यावा, अन्यथा व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.