देवरुख: देवरूखचे सुपुत्र आणि ख्यातनाम संपादक-समीक्षक स्वर्गीय प्रा. श्री. पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साहित्य- संस्कृती व्यवहार या विषयावर १५ नोव्हेंबर रोजी देवरूखमध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
श्री. पुं. चे जन्मघर देवरूख येथे होते. त्याच जागेवर उभारण्यात आलेल्या डी-कॅड कॉलेजमध्ये हे चर्चासत्र होणार आहे.
मुंबईच्या ‘अनुष्टुभ’ या वाङ्मयीन नियतकालिकाने या चर्चासत्राची प्रधान जबाबदारी स्वीकारली असून, त्यांना डी-कॅड कॉलेज आणि आठल्ये-सप्रे-पित्रे कॉलेजचे सहकार्य मिळणार आहे. देवरूखमध्ये झालेल्या ‘अनुष्टुभ’ परिवाराच्या बैठकीत ‘अनुष्टुभ’चे प्रमुख विश्वस्त प्रा. जयप्रकाश लब्धे, साहित्य अकादमी विजेते कादंबरीकार आणि संपादक प्रा. प्रवीण बांदेकर तसेच सदस्य प्राचार्य गोविंद काजरेकर हे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते. चिपळूणचे राजन व सुषमा इंदुलकर, देवरूख कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, डॉ. वर्षा फाटक, प्रा. विक्रम परांजपे, प्रा. धनंजय दळवी आणि व्यवस्थापिका रूपा नलावडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
या नियोजित चर्चासत्रासाठी मराठी कला आणि वाङ्मय संस्कृतीच्या अनेक अभ्यासकांना निमंत्रित करण्यात आले असून लवकरच चर्चासत्राचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. प्रा. धनंजय दळवी आणि रूपा नलावडे यांनी या बैठकीचे नीटनेटके आयोजन केले होते. कोकणातील वाङ्मय अभ्यासकांनी व प्राध्यापकांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. पु. भागवत स्मृतिप्रीत्यर्थ देवरूखमध्ये नोव्हेंबर महिन्यात चर्चासत्र
