रत्नागिरी: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड नं. १ येथील जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रमांनी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत आरोग्य आणि स्वच्छतेचे धडे देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्राणायाम आणि विविध योगासनांचे प्रात्यक्षिक केले. पूर्णगड आरोग्य उपकेंद्राच्या प्रमुख, डॉ. गौरी दामले यांनी यावेळी योगाचे महत्त्व विशद केले. योग हा शरीर, मन आणि बुद्धीसाठी किती आवश्यक आहे, याबद्दल त्यांनी ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या आणि आशा कार्यकर्त्या सौ. पावसकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना हात कसे धुवावेत आणि स्वच्छतेचे महत्त्व काय आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मुलांना स्वच्छतेचे धडे दिले, तसेच मुलांकडूनही हात धुण्याची कृती करून घेतली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती तायशेटे आणि शिक्षक पूर्वा वाकडे, भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण झाली.