GRAMIN SEARCH BANNER

सिंधुदुर्गात दोन आलिशान ‘क्रेटा’ कारसह ५ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त; राजापूरच्या संशयितावर गुन्हा दाखल

Gramin Varta
513 Views

सिंधुदुर्ग :  जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने मंगळवारी इन्सुली-कोठावळेबांध येथे केलेल्या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्वतंत्र कारवायांमध्ये अवैध गोवा दारू तस्करांवर मोठा प्रहार केला आहे. या दोन कारवायांमध्ये एकूण सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात ५ लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि दारू तस्करीसाठी वापरलेल्या दोन आलिशान क्रेटा कार यांचा समावेश आहे.

२४ सप्टेंबर रोजी पहाटे ५.१५ वाजता आणि सकाळी ७.३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावर एकाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहाटे झालेल्या पहिल्या कारवाईत कारचालक महेश मारुती मोरये (रा. नांदगाव, ता. कणकवली) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यासह एका फरार अज्ञाताविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ, इ), ८१, ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मोरये याला अटक करण्यात आली आहे. तर, सकाळी झालेल्या दुसऱ्या कारवाईत ओमकार अनिल गावकर, सद्गुरू पाटील, सतीश करंगुटकर, जतीन गावडे (सर्व रा. सावंतवाडी) आणि अक्षय खटावकर (रा. राजापूर, जि. रत्नागिरी) या पाच जणांविरोधात याच कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाप्रकारे, दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण सहा संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यातील राजापूर, जि. रत्नागिरी येथील संशयित आरोपीचा समावेश असल्याने जिल्ह्याबाहेरही तपासाची व्याप्ती वाढली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर व अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहा. उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार विल्सन डिसोजा, सदानंद राणे, डॉमेनिक डिसोजा, जॅक्सन घोन्साल्विस, आशिष जामदार व पोलिस अंमलदार महेश्वर समजिसकर यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

Total Visitor Counter

2647287
Share This Article