हातखांबा येथे मोफत वैद्यकीय तपासणी
रत्नागिरी: मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथे संस्थेने मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. प्रवासात उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर तातडीने उपचार मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या शिबिराचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर प्रमुख उपस्थित होते.
त्यांच्यासह लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे ज्येष्ठ सदस्य, हॉटेल अलंकारचे मालक आप्पा देसाई आणि लकेश्री पेट्रोल पंपाच्या मालक सौ. लकेश्री मॅडम यांच्या हस्ते नारळ वाढवून शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, विलास बोंबले, राजूशेठ डांगे, महेंद्र डांगे, प्रमोद बोंबले, सचिन बोंबले, साहिल गोरे, संतोष रावणांग, परशुराम शिंदे, श्रीकांत गोरे, मुकेश होरंबे, सुमित सावंत, नचिकेत पोटफोडे, तसेच आरोग्य सेवक एस. एस. कालकर, जय कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल बी. एम. गीते यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. लांबच्या प्रवासामुळे अनेक चाकरमान्यांना थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशा लहान-मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिजाऊ संस्थेने हे शिबिर सुरू केले आहे.
शिबिरात डॉक्टरांची टीम उपलब्ध असून, प्रवाशांची मोफत तपासणी केली जाते आणि आवश्यक औषधोपचारही दिला जातो. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तपासणी आणि औषधोपचाराची उत्तम सोय केली आहे. हे वैद्यकीय तपासणी क्लिनिक हातखांबा येथील लकेश्री पेट्रोल पंपाजवळ सुरू आहे. जर कोणत्याही प्रवाशाला किंवा स्थानिक नागरिकाला तातडीची वैद्यकीय मदत किंवा मोफत रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) हवी असेल, तर त्यांनी जिजाऊ हॉस्पिटलच्या 7385643030 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर यांनी केले आहे.
जिजाऊ संस्थेने हा उपक्रम रत्नागिरीकरांसाठी सुरू केल्याबद्दल हॉटेल अलंकारचे मालक आप्पा देसाई यांनी संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, सचिव केदार चव्हाण, आणि श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे गिरीश पिंगळे यांचे विशेष आभार मानले. समाजाप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध करत जिजाऊ संस्थेने चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.