संगमेश्वर : तालुक्यातील कडवई येथे दागिन्यांसाठी वृद्ध महिलेचा खून केल्याच्या अत्यंत गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी हाजिरा मुसा माखजनकर (वय ७२, रा. कडवई) यांना रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे माखजनकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रकरण असे आहे की, कडवई येथील बानू फकीर मोहम्मद जवळे यांचा खून झाल्याचा गुन्हा संगमेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी हाजिरा माखजनकर, रिजवान महामुद जुवळे आणि हुमायु शकील काझी (रा. संगमेश्वर) या तिघांविरुद्ध खुनाचा आरोप ठेवला आहे. २ मे २०२५ रोजी संशयित आरोपींनी बानू जवळे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले आणि नंतर गळा आवळून त्यांचा निर्घृण खून केला, असे गुन्ह्यात नमूद आहे. खुनानंतर बानू यांचा मृतदेह कडवई ते कुंभारखाणी बुद्रुक रस्त्यावरील खिंडीत जंगलमय भागात फेकून देण्यात आला होता, अशी नोंद संगमेश्वर पोलिसांत आहे.
या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी तिन्ही संशयितांना अटक केली होती. त्यापैकी हाजिरा माखजनकर यांनी जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने युक्तिवाद करताना उपमुख्य लोकअभिरक्षक ॲड. उन्मेष मुळे यांनी, आरोपी हाजिरा या ७२ वर्षांच्या वृद्ध आहेत आणि त्यांचा या गुन्ह्याशी कोणताही थेट संबंध नाही. त्यांच्याविरुद्ध कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नसल्याचे ॲड. मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच, पोलिसांचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आरोपी कुठेही पळून जाणार नाही, तसेच न्यायालयाच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करेल, असे स्पष्ट करत हाजिरा यांना जामीन मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
या उलट, सरकारी पक्षाने हाजिरा माखजनकर यांच्या जामिनाला तीव्र विरोध केला. आरोपींनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गावातील असल्याने हाजिरा या साक्षीदार व फिर्यादी यांच्यावर दबाव आणू शकतात. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती.
दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार मलिकार्जून अंबाळकर यांनी हाजिरा माखजनकर यांना सशर्त जामीन मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.





