GRAMIN SEARCH BANNER

नवीन तंत्रज्ञानाचा वापर न्यायदान क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण – न्या. भूषण गवई

अमरावती: व्यावसायिक विस्तारीकरण झाले आहे. ई -हिअरिंग अशा विविध माध्यमातून नव तंत्रज्ञान न्यायदान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावित आहे. आधुनिक काळात नवीन तंत्रज्ञानाचा वापर न्यायदान क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

कायदेशीर अभ्यासाला आणि संशोधनाला गती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक ई-लायब्ररीमुळे वकील तसेच कायदेविषयक अभ्यासकांना डिजिटल माध्यमातून अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे. या ई-लायब्ररीमुळे कायदेशीर संदर्भ, निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील, ज्यामुळे वकिलांना खटल्यांची तयारी करणे अधिक सोयीचे होईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश न्या. गवई यांनी केले आहे. ॲड. टी. आर. गिल्डा यांच्या स्मृतींना उजाळा देत, त्यांच्या नावाने सुरू झालेली ही ई-लायब्ररी कायदेशीर व्यवसायातील नव्या पायंडा रचेल, असा विश्वास सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केला.

अमरावती जिल्हा वकील संघातर्फे ‘स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी’चे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना इंजिनिअरींग कॉलेज, बडनेरा रोड येथे करण्यात आले. सरन्यायाधीश, न्या. भूषण गवई यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. अतुल चांदुरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या. आलोक आराधे, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती न्या. अनिल किलोर, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्या. नितीन सांबरे, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ तथा अमरावती जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती न्या. प्रविण पाटील, अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, ज्येष्ठ अधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा आदी यावेळी उपस्थित होते.

न्यायदानाच्या प्रक्रियेत खूप बदल झाले आहे. इंटरनेट सुविधेमुळे कामकाजाचे स्वरूप बदलले आहे. यासाठी ई -लायबरी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ई-लायब्ररीचा आपल्या कार्यक्षेत्रात उपयोग करून घ्यावा. नवीन पिढीतील वकिलांना याचा निश्चित फायदा होईल. वकिलांनी रोज वाचन करणे आणि ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. ‘वाचाल तर वाचवाल’ यानुसार अशीलाला मदत करण्यासाठी पारंपारिक वाचन पद्धतीसोबतच ई -लायबरी निश्चितच मदतनीस ठरेल, असा विश्वास व्यक्त करून सरन्यायाधीश. न्या. गवई यांनी ई-लायब्ररीच्या गरजेवर आणि तिच्यामुळे कायदेक्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत यावेळी समाधान व्यक्त केले. कारगिल दिनानिमित्त त्यांनी शहिदांचे स्मरण करून अभिवादन केले. ज्येष्ठ अधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा यांनी इ लायब्ररीच्या स्थापनेसाठी देणगी दिली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील देशमुख यांनी केले. सूत्रसंचलन जिल्हा सरकारी वकील ॲड. परीक्षित गणोरकर आणि सहायक सरकारी वकील ॲड. सोनाली क्षीरसागर यांनी केले. आभार अमरावती जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. लांडे यांनी मानले. कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे अमरावती विमानतळ येथून प्रस्थान झाले. यावेळी आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455627
Share This Article