संगमेश्वर: जून महिन्याची चाहूल लागताच मुलांना शाळेची एक वेगळीच ओढ लागते. याच उत्साहात, पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कुरधुंडा उर्दू येथे नवागतांच्या स्वागतासाठी विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात शिक्षणाच्या जगात पहिले पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी नव्याने शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि गोड खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या आपुलकीच्या स्वागतामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच जमूरतभाई अलजी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “प्रत्येक विद्यार्थ्याने जीवनात काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न बाळगावे,चांगले शिक्षण घेऊन मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न बघा” असे आवाहन त्यांनी केले. त्यांचे हे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरतील.
या कार्यक्रमाला कुरधुंडा उपसरपंच तैमूर अलजी, माजी सरपंच जमूरतभाई अलजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका मुनीजा आलजी आणि शिक्षिका समीरा खान यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तजीन अलजी, समीरा मुल्ला आणि इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या उत्साहाच्या वातावरणात, कुरधुंडा उर्दू शाळेने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची गोडी आणखी वाढण्यास मदत होईल.