रत्नागिरी: प्रतिवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो. यावर्षी संस्कृत दिनाचे औचित्य साधून ६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत रत्नागिरीत संस्कृत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्कृतभारती संस्था विविध संस्थांच्या साहाय्याने रत्नागिरीत विविध उपक्रम आयोजित करत आहे.
यामध्ये आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम असे – ६ ऑगस्ट – रत्नागिरी व आजूबाजूच्या गावातील ३५ विद्यालयांमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सुभाषित पठण अभियान. सर्व शाळांमधील विद्यार्थी १० सुभाषितांचे सामूहिक पठण करतील.
७ ऑगस्ट – कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय – भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रासह प्रश्नमंजूषा आणि संस्कृत दिनाचा कार्यक्रम भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे.
८ ऑगस्ट – सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृह (शेरे नाका) येथे ‘स्तोत्रकाव्यांजली’ हा कार्यक्रम स्वानंद पठण मंडळाने आयोजित केला आहे.
९ ऑगस्ट – संस्कृत दिनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब यांच्या संस्कृत बोधवाक्याचे अनावरण व त्यानिमित्ताने संस्कृत प्रचाराचा कार्यक्रम होणार आहे.
१० ऑगस्ट – सायंकाळी ५ वाजता संस्कृतभारतीचे प्रांतमंत्री नीरज वामन दांडेकर यांचे ऑनलाइन व्याख्यान होईल. त्याच दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहे. भारतीय संस्कृती व संस्कृत भाषेविषयी ही परीक्षा असणार आहे. सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
११ ऑगस्ट – सकाळी ११ वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत विभागासह संस्कृत दिनाचा कार्यक्रम होईल.
१२ ऑगस्ट – भारतीय ज्ञान परंपरेतील प्रसिद्ध असा ‘अष्टावधानकला’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बंगलोर येथील अष्टावधानी विद्वान डॉ. उमामहेश्वर ना. ‘अष्टावधानकला’ सादर करणार आहेत. यामध्ये गोवा व मुंबई येथील विविध विद्वान व्यक्ती सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवनातील वैद्य सभागृहात सायंकाळी ४ ते ७ या वेळेत होणार आहे.
अशा विविधांगी कार्यक्रमांमध्ये सर्व संस्कृत प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संस्कृतभारतीच्या वतीने करण्यात आले आहे.
रत्नागिरीत ६ ते १२ ऑगस्ट या कालावधीत संस्कृतभारतीतर्फे संस्कृत सप्ताह
