GRAMIN SEARCH BANNER

प्रजासत्ताक दिनानिमित्त अपरांत हॉस्पिटलमध्ये महाआरोग्य शिबिर; तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह विविध चाचण्या मोफत

Gramin Varta
116 Views

रत्नागिरी: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील नामांकित ‘अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या वतीने येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी भव्य महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मेडिसिन, ऑर्थोपेडिक आणि जनरल सर्जरी विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार असून, यामध्ये नागरिकांना एकाच छताखाली विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मोफत तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.

या शिबिरामध्ये जे. जे. हॉस्पिटलमधून प्रशिक्षित एम.डी. फिजिशियन डॉ. गायकवाड, फिजिशियन डॉ. हर्षद होन, सुप्रसिद्ध जनरल सर्जन डॉ. सद्गुरु पाटणकर, जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रीश भास्करवार, फिजिओथेरपिस्ट डॉ. रुचिरा सुर्वे आणि आहारतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश बर्वे यांसारख्या नामवंत तज्ज्ञांची टीम रुग्णांची तपासणी करणार आहे. या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे हाडांचा ठिसूळपणा तपासण्यासाठीची ‘बी.एम.डी.’ चाचणी, श्वसनक्षमतेसाठी ‘स्पायरोमेट्री’ चाचणी तसेच ईसीजी आणि ब्लड प्रेशर यांसारख्या महत्त्वाच्या तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. विशेषतः महिला आणि ज्येष्ठांमध्ये आढळणारा ऑस्टिओपोरोसिस तसेच दमा व हृदयाशी संबंधित आजारांचे निदान वेळीच व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे.

सामान्यतः रुग्ण मूळ आजारावर उपचार घेत असताना सांधेदुखी, श्वसनविकार किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या इतर तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. रुग्णांची हीच गरज ओळखून अपरांत हॉस्पिटलने एकाच वेळी विविध समस्यांवर मार्गदर्शनाची सोय केली आहे. या सामाजिक उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले असून नावनोंदणीसाठी ८३८०८६०१३६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3388228
Share This Article