‘झिरो इलेक्ट्रिसिटी बिल’ देणारे पानवल धरण ९० टक्के पूर्ण; रत्नागिरीकरांची पाणीटंचाई कायमची मिटणार

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

रत्नागिरी : रत्नागिरी शहराची तहान भागवणारे आणि शहराची ‘जीवनवाहिनी’ मानले जाणारे नगर परिषदेच्या मालकीचे पानवल धरण आता कायापालट करून सज्ज झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटण्याच्या मार्गावर असून धरणाच्या दुरुस्तीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

शासनाकडून मिळालेल्या १६ कोटी रुपयांच्या भरीव निधीतून सुरू असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९० टक्के काम यशस्वीपणे पूर्ण झाले असून, उर्वरित १० टक्के काम पुढील महिन्याभरात पूर्ण होणार आहे. यापूर्वी धरणाला लागलेल्या गळतीमुळे चिंतेचे वातावरण होते आणि गळतीमुळे केवळ २ टीएमसी पाणीच प्रत्यक्षात वापरात येत असे, ज्यामुळे डिसेंबर-जानेवारी महिन्यातच धरण कोरडे पडत होते. मात्र, आता झालेल्या अत्याधुनिक दुरुस्तीनंतर धरणाची साठवण क्षमता प्रचंड वाढणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यानंतर या धरणात तब्बल १० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार असून, यामुळे उन्हाळ्यातील पाणी कपातीचे संकट आता इतिहासजमा होणार आहे. धरण दुरुस्तीच्या प्रक्रियेत मुख्य भिंतीचे ग्राउटिंग करून पाणी वाया जाणे पूर्णपणे थांबवण्यात आले असून धरण क्षेत्रातील गाळ काढल्यामुळे साठवणूक क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. तसेच सांडव्याची डागडुजी करून धरणाचे आयुष्य वाढवण्यात आले आहे. आता केवळ गेट्सची किरकोळ दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम बाकी असून लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास सज्ज होईल. विशेष म्हणजे ‘झिरो इलेक्ट्रिसिटी बिल’ देणारे हे धरण रत्नागिरीकरांसाठी जलसंपत्तीच्या दृष्टीने एक वरदान ठरणार असून पुढील महिन्याभरात या संपूर्ण प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *