शृंगारतळीत ‘ओंकार ज्वेलर्स’मध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

गुहागर : तालुक्यातील मध्यवर्ती व्यापारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे मंगळवारी मध्यरात्री ‘ओंकार ज्वेलर्स’ हे दुकान फोडून चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. दुकानाचे पहिले शटर उघडून आत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या शटरचे टाळे तोडणे शक्य न झाल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुहागर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे.

शृंगारतळी बाजारपेठेत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या ज्वेलर्सच्या दुकानात मंगळवारी मध्यरात्री तोंडाला मास्क लावून दोन चोरटे शिरले. त्यांनी इरटिका कारमधून येत दुकानाचे पहिले टाळे तोडून शटर उघडले आणि आत प्रवेश केला. आत गेल्यावर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळया रंगाचा स्प्रे मारून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यापूर्वीच त्यांचे चित्रीकरण कॅमेऱ्यात कैद झाले होते. आतील शटरचे टाळे तोडण्यात अपयश आल्यामुळे या दुकानातील कोणतेही दागिने चोरीला गेले नाहीत. या घटनेमुळे शृंगारतळीतील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही परिसरात एटीएम आणि फ्लॅट फोडण्याचे प्रकार घडले होते. गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी या चोरीच्या प्रयत्नाची नोंद करून घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगितले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *