GRAMIN SEARCH BANNER

खेड पोलिसांची मोठी कारवाई; मंदिरांतील घंटा चोरणारा दुसरा भामटा जेरबंद, १० लाखांचा ऐवज जप्त

Gramin Varta
154 Views

ट्रक आणि २५३ किलो पितळ जप्त

खेड : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील मंदिरांमध्ये झालेल्या घंटा चोरीच्या प्रकरणात खेड पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हिरालाल गंगारामजी कुम्हार (रा. पनवेल, मूळ गाव राजस्थान) याला गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि २५३ किलो पितळ असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

खेड तालुक्यातील शिरगाव खुर्द-शिवाजीनगर येथील श्री काळकाई मंदिरातून पितळी घंटा आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी राकेश तुळशीराम पडवकर याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर तब्बल १६ चोऱ्यांचा उलगडा झाला होता. या प्रकरणाच्या सखोल तपासात दुसऱ्या संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हिरालाल कुम्हार याला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. या दुसऱ्या अटकेमुळे चोरीची आणखी काही मोठी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास अधिक गतिमान केला आहे.

Total Visitor Counter

3262296
Share This Article