GRAMIN SEARCH BANNER

खळबळजनक ! रत्नागिरीत २.५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून २.५ किलो वजनाचे आणि २.५ कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला १ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती की, तो एमआयडीसी रत्नागिरी येथे लुप्तप्राय प्रजातीच्या व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले.

या पथकाने एमआयडीसी परिसरात सापळा रचला आणि रात्री १०.४५ च्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी एजाज अहमद युसूफ मिरकर (वय ४१, रा. रत्नागिरी) याला विनापरवाना अंबरग्रीस विक्रीच्या उद्देशाने बाळगताना पकडण्यात आले. त्याच्याकडून २.५ किलो वजनाचे अंबरग्रीस आणि ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २,५०,५०,०००/- (दोन कोटी पन्नास लाख पन्नास हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी. पोलीस उप-निरीक्षक संदीप ओगले, आणि पोलीस अंमलदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, गणेश सावंत, अतुल कांबळे यांचा समावेश होता.

Total Visitor Counter

2650937
Share This Article