रत्नागिरी : लग्नाच्या चर्चेतून झालेल्या वादामुळे रत्नागिरी कुवारबाव येथील एका २६ वर्षीय युवतीने तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील अॅस्टर आधार रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली प्रकाश गाडी (वय २६, रा. वेळवण, ता.जि. रत्नागिरी) ही युवती आपली आई आणि बहीण दिपाली देवेंद्र घाटकर यांच्यासह १७ जुलै २०२५ रोजी कुवारबाव येथील आपल्या घरी आली होती. प्रणालीच्या लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी ते एकत्र जमले होते. मात्र, या चर्चेतून काहीतरी वाद झाला. या वादामुळे व्यथित झालेल्या प्रणालीने १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी तणनाशक प्राशन केले. तणनाशक प्राशन केल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला तात्काळ रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, अधिक उपचारांसाठी तिला कोल्हापूर येथील अॅस्टर आधार रुग्णालयात हलवण्यात आले.
अॅस्टर आधार रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असतानाच, १९ जुलै २०२५ रोजी रात्री ७.१० वाजता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती अॅस्टर आधार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रत्नागिरी पोलिसांना दिली.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लग्नावरून झालेल्या वादातून कुवारबाव येथील तरुणीची आत्महत्या
