खेड : तालुक्यातील कुळवंडी, देउळवाडी येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून खेड पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या घटनेत रणजित राजाराम निकम आणि गणेश दिलीप निकम हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, गणेश दिलीप निकम यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त कुळवंडी येथील शाळा क्र. १ मध्ये वह्या, पेन, पेन्सिल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उशीर झाल्याने वादाची ठिणगी उडाली.
फिर्यादी रणजित राजाराम निकम (वय ४०, रा. कुळवंडी, देउळवाडी) यांच्या तक्रारीनुसार, कार्यक्रमाला उशीर झाल्याने त्यांनी शाळेत आक्षेप घेतला होता. घरी परतल्यानंतर, गणेश दिलीप निकम (रा. कुरवंडी लाडवाडी) आणि त्याचा भाऊ रुपेश निकम त्यांच्या अंगणात आले. गणेशने त्यांना शाळेत काय बोलला असे विचारले असता, रणजित यांनी कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वेळेनुसार करायला हवे होते असे सांगितले. यावर चिडून गणेशने रणजितला धक्का दिला. त्यानंतर वाद उफाळला. रणजितची पत्नी सोडवण्यासाठी आली असता, गणेशने तिच्या मॅक्सीची कॉलर धरून तिला खाली पाडले. रणजित आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी गेले असता, गणेशने स्वतःच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून लोखंडी फायटर काढून रणजितच्या डाव्या बाजूला डोक्यावर मारून दुखापत केली. गणेशने शिवीगाळ करून मारण्याची धमकीही दिली, असे रणजित यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी गणेश दिलीप निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूने, गणेश दिलीप निकम (वय ३०, रा. कुळवंडी, लाडवाडी) याने दिलेल्या तक्रारीनुसार, कार्यक्रमाला उशीर झाल्याने रणजित निकम याने शाळेतील शिक्षिका आणि अध्यक्षांना दमदाटी केली. त्यानंतर गणेश त्यांच्या भावासह (रुपेश) मोटारसायकलवरून खेड येथे जात असताना, रणजित निकम त्यांच्या घरासमोर उभा दिसला. गणेशने त्याला शाळेत झालेल्या कार्यक्रमाबद्दल विचारले असता, रणजित म्हणाला की त्याला फक्त गोंधळ करायचा होता. यावरून दोघांमध्ये झटापट झाली. रणजितने गणेशला धक्का दिला आणि त्यानंतर तेथे असलेला लोखंडी रॉड उचलून गणेशच्या डोक्यावर मारला, यावेळी त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. या घटनेत गणेश दिलीप निकम जखमी झाले. या प्रकरणी रणजित राजाराम निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.
खेडमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून जोरदार हाणामारी: परस्परविरोधी तक्रारी, दोघांना दुखापत

Leave a Comment