संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथे एका विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. जेसीबीच्या मदतीने या गव्याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोंडगाव येथील सुरेश गांधी यांच्या मालकीच्या शेतात ही १५ फूट खोल विहीर आहे. या विहिरीतील पाण्याचा वापर बोअरवेलच्या माध्यमातून केला जातो. गेल्या काही दिवसांपासून या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने सुरेश गांधी यांनी मंगळवारी सकाळी विहिरीची पाहणी केली. तेव्हा त्यांना विहिरीच्या पाण्यात गवा तरंगताना दिसला. त्यांनी तात्काळ वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाचे वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक सूरज तेली, आकाश कडुकर, सुप्रिया काळे, सहयोग कराडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पंचनामा केला. विहिरीपासून काही अंतरावर खड्डा खोदून मृत गव्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनविभागाच्या अंदाजानुसार, हा गवा चार ते पाच दिवसांपूर्वी विहिरीत पडला असावा.