देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील तिवरेतर्फे मेढे येथे गुटखा विक्री प्रकरण उघडकीस आणत देवरूख पोलिसांनी चार जणांना अटक केली. मंगळवारी त्यांना देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी सर्वांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
सोमवारी मध्यरात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे लांजा विभागीय गस्त घालत असताना तिवरेतर्फे मेढे येथे एक तवेरा कार संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले. चौकशीसाठी जवळ गेल्यानंतर चालकाने वेगाने गाडी पळविली. तब्बल वीस किलोमीटर थरारक पाठलाग केल्यानंतर हातखंबा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने गाडीला अडवण्यात यश आले. पाहणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
पोलिसांनी पाच लाख रुपये किमतीची तवेरा कार आणि चार लाख एक्केचाळीस हजार पन्नास रुपयांचा गुटखा असा एकूण नऊ लाख एक्केचाळीस हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मुबीन अश्रफ मेमन (१९), तायरा अश्रफ मेमन (५०), अश्रफ हाजी दाऊद मेमन (५२) तिघेही रा. रत्नागिरी मच्छीमार्केट, झरणी रोड तसेच अब्बास इरफान जुन्नानी (२०, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली. मंगळवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव यांनी दिली.