खेड: शनिवारी सायंकाळी खेड-भरणे रस्त्यावरील गोळीबार मैदान परिसरात एका भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने एका ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अभिषेक बैकर (रा. भरणे नाका, खेड) हा तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना, स्पीड ब्रेकरजवळ असलेल्या एका ट्रकला त्याची दुचाकी मागून आदळली. धडक इतकी जोरदार होती की, अभिषेकला डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत अभिषेकला मदतीसाठी पुढे सरसावले. त्यांनी त्याला तातडीने खेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुखापतीची गंभीरता लक्षात घेता, अभिषेकला पुढील उपचारांसाठी डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आले.