रत्नागिरी : खेड्यापाड्यातील प्रत्येकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी राज्य शासनाने जलजीवन मिशनअंतर्गत विविध योजना सुरू केल्या. मात्र या योजनांवर काम करणाऱ्या ठेकेदारांची तब्बल ८० कोटी रुपयांची बिले प्रलंबित राहिल्याने मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. परिणामी ठेकेदारांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील जवळपास ७५० प्रकल्प ठप्प झाले आहेत.
जिल्ह्यात एकूण १,४३२ योजना मंजूर असून त्यापैकी १,४२८ योजनांना कार्यादेश देण्यात आला होता. यापैकी १,४१३ कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. त्यात ५६४ योजना पूर्णत्वास गेल्या असून ३०५ योजनांचे ७५ ते १०० टक्के काम, ३०७ योजनांचे ५० ते ७५ टक्के काम, १७५ योजनांचे २५ ते ५० टक्के काम, तर ५४ योजनांचे केवळ २५ टक्क्यांपर्यंतच काम झाले आहे.
कामे वेगवेगळ्या टप्प्यांवर असतानाही ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने ते वारंवार जिल्हा परिषदेच्या दारात पाठपुरावा करत आहेत. मात्र शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने बिले अडकली आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनची अनेक कामे अधांतरी राहिली असून, शासनाकडून निधी मिळाल्याशिवाय प्रकल्प पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
८० कोटींची बिले थकीत; रत्नागिरीत जलजीवन मिशनची ७५० कामे ठप्प
