GRAMIN SEARCH BANNER

जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी – ॲड. प्रकाश आंबेडकर

Gramin Varta
7 Views

मुंबई: महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे.

याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‎मुंबईत राजगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‎ॲड. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने जनसुरक्षा विधेयकाला यापूर्वीच विरोध दर्शवला होता आणि आता याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राजकीय पक्षांनीही या लढ्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.

‎‎मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शस्त्रपूजेच्या फोटोंवर विरोधी पक्षांच्या शांततेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्यांच्याकडे ही शस्त्रे आहेत, त्यांच्यावर या जनसुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई होणार आहे की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. कायद्यानुसार पिस्तूल बाळगणे कायदेशीर आहे, परंतु एके-४७ आणि टॉमी गन यांसारखी शस्त्रे बाळगणे कायद्याने गुन्हा आहे आणि हे राज्य उलथवून टाकण्यासारखे आहे. आरएसएस ही शस्त्रे जवळ बाळगतेय, त्यावर या कायद्यांतर्गत आधी कारवाई करावी, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

‎‎सभागृहात विरोधाचा अभाव –

‎जनसुरक्षा विधेयकाला सभागृहात आक्रमकपणे विरोध झाला नाही याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, लोकांनी समाज माध्यमांवर विरोध केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मीडियासमोर येऊन बोलणे ही ‘नौटंकी’ आहे.

शहरी नक्षलवाद म्हणजे नेमकं काय?

कामगारांच्या मोर्च्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? एखाद्या राजकीय पक्षाने एखाद्या विषयावर लढा उभा केला त्याला तुम्ही

अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? शेतकऱ्यांनी शेतमालाला भाव मिळत नाही, म्हणून त्याविरोधात आवाज उठवला तर त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? खाजगी सावकाराच्या विरोधात कारवाई करा, ही मागणी केल्यावर त्यांना अर्बन नक्षलवाद म्हणणार का ? सरकार नेमकं कोणाला अर्बन नक्षलवाद ठरवणार आहे?

ज्याच्याकडे शस्त्र, दारुगोळा आहे, त्याला तुम्ही नक्षलवादी ठरवू शकतात कारण, बेकायदेशीर मार्गाने तो राज्याला उलथू पाहतोय. बेकायदेशीर मार्गाने राज्य उलथवणाऱ्यांकडे शस्त्र, दारुगोळा आहे की नाही ते तपासले पाहिजे.

Total Visitor Counter

2647028
Share This Article