GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-जयगड-विजयदुर्ग रो-रो बोटसेवा 1 सप्टेंबरपासून

रत्नागिरी : गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी राज्य शासनाने मुंबई ते जयगड-रत्नागिरी आणि मुंबई ते विजयदुर्ग-सिंधुदुर्ग रो-रो बोटसेवा सुरू केली असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.1 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी ही रो-रो बोटसेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय शिपिंग मंत्रालय आणि राज्याच्या बंदरे विभागाने या जल वाहतूक सेवेस अंतिम मंजुरी दिली आहे. या रो-रो सेवेसाठी अत्यावश्यक असणार्‍या एकूण 147 परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. यामुळे कोकणवासीयांचा अतिशय सुरक्षित व जलद प्रवास होणार आहे. हवामानाच्या बदलामुळे मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याने हवामान सुरळीत होताच प्रत्यक्ष प्रवाशांसाठी ही रो-रो सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

भाऊचा धक्का ते जयगड तीन तास, तर भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पाच तास प्रवास करता येणार आहे. येथे जेट्टीची सुविधा असून, जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बसेसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 25 नॉटस् स्पीडची ही एम टू एम नावाची रो-रो बोट असणार आहे, जी दक्षिण आशियातील वेगवान बोट आहे. यामध्ये इकॉनॉमी वर्गात 552 आसनांची व्यवस्था, प्रीमियम इकॉनॉमीमध्ये 44, बिझनेसमध्ये 48, तर फर्स्ट क्लासमध्ये 12 प्रवाशांची क्षमता असणार आहे. तसेच 50 चारचाकी, 30 दुचाकी क्षमता असलेली ही रो-रो आहे.

यासाठी कोकणवासीयांना इकॉनॉमी क्लाससाठी 2 हजार 500 रुपये दर आकारला जाणार आहे, तर प्रीमियम इकॉनॉमीसाठी प्रवाशांसाठी चार हजार रुपये, बिझनेस क्लाससाठी 7 हजार 500, फर्स्ट क्लाससाठी 9 हजार रुपये दर आकारला जाणार आहे.?तसेच चारचाकीसाठी 6 हजार दर, दुचाकीसाठी एक हजार दर, सायकलसाठी 600 दर, मिनी बससाठी 13 हजार आणि बसच्या आसन क्षमतेप्रमाणे भाडे वाढत जाणार आहे. भविष्यात श्रीवर्धन, मांडवा असे विविध थांबे असणार आहेत. त्यासाठी जेट्टीही तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली.

Total Visitor Counter

2474852
Share This Article