रत्नागिरी: शहरातील एका बांधकाम साईटवर काम करत असताना डोक्यावर सिमेंटचे मटेरियल पडून जखमी झालेल्या पश्चिम बंगालमधील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राम महादेव अधिकारी (वय ५८, रा. पश्चिम बंगाल) असे या दुर्दैवी कामगाराचे नाव असून, या घटनेमुळे परप्रांतीय कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मयत राम अधिकारी हे रत्नागिरीत ‘बालाजी इंजिनीअरिंग वर्क्स’ या कंपनीत सेंट्रिंगचे काम करत होते. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून कच्चे सिमेंटचे मटेरियल खाली टाकत असताना ते अचानक राम यांच्या डोक्यावर पडले. या अपघातात त्यांच्या कपाळाला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले होते. कोल्हापूर येथे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, त्यानंतर ते रत्नागिरीतील आपल्या खोलीवर विश्रांती घेत होते.
सोमवारी, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी कामावरून परतलेले इतर कामगार राम यांना उठवण्यासाठी गेले असता ते शुद्धीवर नसल्याचे निदर्शनास आले. सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना परकार हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलोन दास यांनी तपासणीनंतर राम अधिकारी यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मूळचे पश्चिम बंगालमधील नद्या जिल्ह्यातील असलेल्या या कामगाराच्या निधनामुळे त्यांच्या सहकारी कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







