GRAMIN SEARCH BANNER

६ डिसेंबरपासून रंगणार रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला नवी दिशा देणारा ‘कुणबी महोत्सव’

Gramin Varta
214 Views

दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमुळे येणार कार्यक्रमाला रंगत

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण संस्कृतीला एक नवी ओळख आणि विकासाची नवी दिशा देण्यासाठी ‘कुणबी महोत्सव’ या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ६ आणि ७ डिसेंबर रोजी संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे देवळे येथील गोताडवाडी येथे हा महोत्सव संपन्न होणार आहे. संस्कृती, कला, क्रीडा आणि स्वाभिमान या चार स्तंभांवर आधारित हा महोत्सव ग्रामीण जीवनातील चैतन्य पुन्हा जागृत करणारा ठरेल असा विश्वास आयोजक सुहास खंडागळे,उदय गोताड यांनी व्यक्त केला आहे.

हा महत्त्वाकांक्षी महोत्सव आयोजित करण्यासाठी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे, अध्यक्ष उदय गोताड, आणि उपाध्यक्ष मंगेश घावडे यांनी पुढाकार घेतला आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ६ डिसेंबर रोजी महोत्सवाचा श्रीगणेशा चित्रकला स्पर्धा, आकर्षक रांगोळी स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, त्याचबरोबर सायंकाळी पाच वाजता जिल्हा कृषी अधीक्षक रत्नागिरी यांच्यामार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असून रात्री
‘धमाल’ मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित जनसमुदायाचे मनोरंजन केले जाईल.

तर, महोत्सवाचा दुसरा दिवस, ७ डिसेंबर, अधिक सांस्कृतिक रंग घेऊन येणार आहे. या दिवशी नृत्य स्पर्धा, कुणबी संस्कृतीचे विशेष प्रदर्शन त्याचबरोबर रत्नागिरी भूषण पुरस्कार २०२५, आणि महाराष्ट्राचे फणसकिंग मिथिलेश देसाई यांचे विशेष मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभणार आहे. त्याचबरोबर कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सर्वांचा लाडका यूट्यूबर, रिल्स्टार कोकणी निखिल म्हणजेच निखिल सकपाळ, महाराष्ट्राचे फणसकिंग मिथिलेश देसाई, बेवड्याक मान नाय कविता फेम संदीप पावसकर, तसेच विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवाच्या माध्यमातून कुणबी समाजाची समृद्ध परंपरा, कला आणि क्रीडा क्षेत्रातील कौशल्ये एकाच व्यासपीठावर अनुभवण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण जीवनाला एक नवी उमेद आणि विकासासाठी एकजूट करण्याचे उद्दिष्ट या महोत्सवाच्या आयोजनामागे आहे, ज्यामुळे संगमेश्वरसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. करंबेळे येथील गोताडवाडी येथे होणाऱ्या या महोत्सवासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Total Visitor Counter

3369667
Share This Article