GRAMIN SEARCH BANNER

न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के; ग्रामीण भागातील यशाचा आलेख उंचावला

Gramin Varta
30 Views

संगमेश्वर:  तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या नवनिर्मिती फाउंडेशन उक्षी संचलित, न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल (आंबेड बुद्रुक) या शाळेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची दैदीप्यमान कामगिरी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील सर्वसामान्य, शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात शाळेचे कौतुक होत आहे.

यंदाच्या परीक्षेत शाळेचा विद्यार्थी अमान हारून आंबेडकर याने ८७.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. असजद सलीम सय्यद याने ७४.२० टक्के गुणांसह द्वितीय, तर रुद्र चंद्रकांत नागवेकर याने ६०.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. यशस्वी विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशामुळे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणे हे एक मोठे आव्हान मानले जाते. मात्र, नवनिर्मिती फाउंडेशनने मर्यादित साधनसामग्रीचा अडसर येऊ न देता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शिस्त, नैतिक मूल्ये आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा योग्य समन्वय साधत शाळेने अल्पावधीतच शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या यशाचे संपूर्ण श्रेय शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाला देताना संस्थेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी घेतलेले अतिरिक्त तास, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम या निकालातून दिसून येत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन दिल्यानेच हे यश साध्य झाले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते कोणत्याही स्पर्धेत मागे राहत नाहीत, हे न्यू व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलने आपल्या निकालातून सिद्ध केले आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Total Visitor Counter

3369326
Share This Article