रत्नागिरी: जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत 1 हजार 432 पाणी योजनांची कामे सुरू आहेत. त्यापैकी 536 योजनांची कामे पूर्ण झाली असली तरी 62 टक्क्यांहून अधिक कामे अद्याप अपूर्ण आहेत. या योजनांसाठी एकूण 1152.80 कोटींची तरतूद असून, आतापर्यंत केवळ 590.10 कोटींचीच कामे पूर्ण झाली आहेत. योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अजूनही नळजोडणीच्या प्रतीक्षेत असलेली घरे आहेत.
2024-25 च्या भौतिक प्रगती अहवालानुसार केवळ 37.54 टक्के कामे पूर्ण झाली असून, बहुतांश योजनांचे काम सुरू असले तरी त्यांची गती अत्यंत मंद आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन योजना 2020 पासून सुरू झाली असून, प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणीद्वारे दररोज 55 लिटर प्रती व्यक्ती पाणीपुरवठा करण्याचा उद्देश आहे. मात्र प्रत्यक्षात निधी वितरणाच्या विलंबामुळे ही योजना अडथळ्यांमध्ये सापडली आहे.
100 टक्के पूर्ण झालेल्या 536 योजनांसाठी 13 कोटी 76 लाख तर 75 टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेल्या 307 योजनांसाठी 4 कोटी रुपये इतकी रक्कम ठेकेदारांना मिळालेली नाही. एकूण 18 कोटी रुपयांचे थकीत बिल असल्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी नवीन कामांचा वेग मंदावला आहे. जिल्हा परिषदेने ही थकबाकी मिळावी यासाठी शासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीत होणाऱ्या अडचणीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यासोबतच 2002 ते 2009 या कालावधीत राबवलेल्या शिवकालीन पाणी साठवण योजना देखील अपूर्ण अवस्थेतच आहेत. पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा हेतू असलेल्या या योजनांनाही अपेक्षित गती मिळालेली नाही.
निधी वितरणात होणाऱ्या विलंबामुळे आणि प्रशासनिक दिरंगाईमुळे “हर घर नल से जल” ही संकल्पना कागदावरच मर्यादित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जलजीवन मिशनला जिल्ह्यात ब्रेक? 62% योजना अर्धवट; 18 कोटींचे ठेकेदारांचे देणे प्रलंबित
