रत्नागिरी: दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे धावपटू प्रसाद देवस्थळी यांचा रत्नागिरीतील वॉकर्स ग्रुप आणि रत्नदुर्ग माउंटेनिअर्सतर्फे सत्कार करण्यात आला.
दक्षिण आफ्रिकेतील अत्यंत खडतर अशी ९० किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करून रत्नागिरीचा झेंडा श्री. देवस्थळी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवला. त्यानिमित्ताने हा सत्कार करण्यात आला. वॉकर्स ग्रुपचे प्रमुख व क्रेडाई रत्नागिरीचे अध्यक्ष महेश गुंदेचा व रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष व बांधकाम व्यावासयिक वीरेंद्र वणजू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.रत्नागिरीमध्ये धावण्याची संस्कृती रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न प्रसाद देवस्थळी यांनी केला असून त्यात चांगले यश मिळत आहे. ते रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचेही संस्थापक सदस्यांपैकी एक सक्रिय सदस्य आहेत. रत्नागिरी सायकलिस्ट ग्रुप आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे प्रेरणादायी आयोजक म्हणून देवस्थळी सुपरिचित असून नुकतीच त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केली. यानिमित्त त्यांना सन्मानित करण्यात आले.
सत्कारावेळी वीरेंद्र वणजू यांनी सांगितले की, कोकणच्या शौर्यगाथेचा वारसा प्रसादने जपला आणि आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन रत्नागिरीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. हा क्षण फक्त गौरवाचा नाही, तर पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा ठरला आहे.उद्योजक महेश गुंदेचा म्हणाले की, प्रसाद देवस्थळी यांचे हे यश आमचे सामूहिक स्वप्न आहे आणि तुम्ही ते साकार करून दाखवले आहे. आपण रत्नागिरीच्या मातीचा अभिमान आहात. कॉम्रेड मॅरेथॉनला रत्नागिरीतून पुढील वर्षी आणखी काही धावपटू नक्की पोहोचतील, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू या.यावेळी तुषार खानविलकर, संजय मुटघर, विनय जांगळे, मिलिंद मिरकर, आशीष भालेकर, नितीन लाखण, डी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विक्रांत रावराणे, रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे गौतम बाष्टे, पराग सुर्वे, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत, शैलेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आफ्रिकेत जसे जगभरातील धावपटू जातात तसेच जगभरातील धावपटू एक दिवस नक्की कोकणात येतील, पण त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. कोकणवासीयांनी कोकणवासीयांची संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली कोकण कोस्टल मॅरेथॉन असे वर्णन प्रत्येक कोकणवासीय करत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती किमान १० किमीसाठी आणि नंतर २१ किमीसाठी सहभागी व्हावे, यासाठी कोकणवासीयांना कळकळीचे आवाहन करतो.
कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी यांचा रत्नागिरीत सत्कार
