रत्नागिरी: पाली पोलिसांची धडक कारवाई; चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या २४ तासांत सिंधुदुर्गातून हस्तगत

Gramin Varta
256 Views

पाली (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी तालुक्यातील पाली घडशीवाडी येथून चोरीस गेलेली दुचाकी अवघ्या २४ तासांच्या आत शोधून काढण्यात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पाली पोलीस दूरक्षेत्राच्या पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास चक्रे फिरवत ही दुचाकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ताब्यात घेतली असून, पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घडशीवाडी येथील सुमित्रा चाळ परिसरातील रहिवासी सचिन शिवाजी गोंधळी यांनी आपली ‘हिरो स्प्लेंडर प्लस’ दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एव्ही ४२९२) दि. २० ऑगस्ट रोजी रात्री घरासमोर उभी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी आजूबाजूला शोध घेतला; मात्र दुचाकी न सापडल्याने अखेर पाली पोलीस दूरक्षेत्रात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

गुन्ह्याची नोंद होताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस दूरक्षेत्राचे तपास अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर जाधव, पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्याजी पाटील यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठपुरावा केला असता, दि. २१ ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-निपाणी रस्त्यावरील हाडपिड दत्तमंदिर परिसरात सदर दुचाकी बेवारस स्थितीत मिळून आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन दुचाकी जप्त केली. अवघ्या २४ तासांत दुचाकीचा शोध लावून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पाली पोलीस पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4750451
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *