गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला बॅडमिंटन संघाची विजेतेपदाची हॅट्रिक; पुरुष संघाला कांस्यपदक

Gramin Varta
101 Views

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) महिला संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदकासह विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या विजेतेपदासह महिला संघाने कोंकण विभाग बॅडमिंटन स्पर्धेतील सलग तिसरे अजिंक्यपद मिळवत विजेतेपदाची हॅट्रिक साधली आहे. महाविद्यालयाच्या पुरुष संघानेही उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

मुंबई विद्यापीठाच्या कोंकण विभाग आणि डॉ. आबासाहेब मराठे आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, हातिवले (ता. राजापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कोंकण विभाग क्र. ४ आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.

महिला विजेत्या संघात कु. श्रुती फणसे (एम.ए. भाग-२), कु. चार्वी कापडी (द्वितीय वर्ष वाणिज्य), कु. तन्वी घाणेकर (एम.कॉम. भाग-१), कु. श्रावणी शिंदे (द्वितीय वर्ष बायोटेक) आणि कु. गौरवी गावडे (द्वितीय वर्ष बायोटेक) यांचा समावेश होता.

पुरुष संघानेही स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत कांस्यपदक मिळविले. पुरुष संघात कु. सिद्धेश फणसेकर (एम.कॉम. भाग-१), कु. अथर्व कारेकर (एम.बी.ए.), कु. आदित्य शिर्के (तृतीय वर्ष विज्ञान), कु. परेश तळेकर (एम.बी.ए.), कु. शौनक भावे (एम.कॉम. भाग-२), कु. आकाश पालवे (प्रथम वर्ष कला) आणि कु. सलील कांबळे (प्रथम वर्ष वाणिज्य) या खेळाडूंचा सहभाग होता.

महाविद्यालयाच्या दोन्ही संघांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके आणि श्री. माधव फणसे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

महिला संघाने सलग तिसऱ्यांदा कोंकण विभागाचे अजिंक्यपद पटकावत महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे, प्राध्यापक, कर्मचारी व सेवक यांनी विजेत्या महिला संघासह कांस्यपदक प्राप्त पुरुष संघाचे अभिनंदन केले.

दोन्ही संघांच्या या यशाबद्दल महाविद्यालय परिसरातून कौतुक होत असून, आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Total Visitors :
4745488
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *