‘वॉक फॉर वॉटर’च्या माध्यमातून हजारो रत्नागिरीकरांनी दिला जल व मृद संवर्धनाचा संदेश
रत्नागिरी: “पाण्याचा प्रत्येक थेंब जपूया, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया” असा दृढ संकल्प करत रत्नागिरी शहरात जलसंधारण दिनानिमित्त भव्य ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उत्साहात पार पडली. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकररावजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या ३ किलोमीटरच्या पदयात्रेत विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलजागृतीचा प्रभावी संदेश दिला.
सकाळच्या आल्हाददायक वातावरणात शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात हजारो रत्नागिरीकर एकत्र आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशिक्षक सानिका चव्हाण हिने संगीताच्या तालावर झुम्बा वॉर्मअप करून घेतला. त्यानंतर उपस्थितांनी पाणी आणि माती वाचवण्यासाठी, भूजल पुनर्भरण करण्यासाठी आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची सामूहिक शपथ घेतली. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड तसेच मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला.
जयस्तंभ चौक ते माळनाका आणि पुन्हा जयस्तंभ चौक अशा मार्गाने निघालेल्या या पदयात्रेत महाविद्यालयीन तरुण, एनएसएस व एनसीसी कॅडेट्स, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पटवर्धन हायस्कूल, दामले हायस्कूल, जीजीपीएस, फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज, फाटक हायस्कूल, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन आणि शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पदयात्रेत शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. सांगतेनंतर सहभागी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमाला जलदूत वल्लभ वणजू, राजू भाटलेकर, नगरसेवक सुहेल मुकादम, फैयाज मुकादम, गणेश धुरी आणि सुमित ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अभियंता आकांक्षा साळवी यांनी केले, तर कार्यकारी अभियंता धनंजय साहुत्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले. उप अभियंता अनिकेत शिरगावकर, संकेत शेट्ये, धनश्री मिसाळ, प्रमोद जाईल, कनिष्ठ अभियंता मंथन कांबळे आणि राजेश चिखलकर यांनी नियोजन यशस्वी केले. पाणी आणि माती संवर्धनाची ही मोहीम अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी नागरिकांनी व्यक्त केला.





