रत्नागिरी: प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. हे आंदोलन दुपारी ३ ते ६ या वेळेत जिल्हाध्यक्ष दिलीप महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे.
शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता निर्णयानुसार पदवीधर शिक्षकांचे उपशिक्षक पदावर झालेले समायोजन, पवित्र पोर्टलद्वारे गणित व विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या भरतीसाठी प्रसिद्ध झालेली जाहिरात, तसेच पदवीधर शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटींचे निवारण या प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. या संदर्भात वर्षभरापासून जिल्हा परिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करत अखेर शिक्षक समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या जिल्हाव्यापी आंदोलनात खेड तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटना प्रवक्ते शैलेश पराडकर व दिलीप यादव यांनी केले आहे. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, सचिव धर्मपाल तांबे, प्राथमिक शिक्षक पतपेढी चेअरमन सुनील दळवी, तालुका नेते बबन साळवी, कार्याध्यक्ष अनिल यादव, कोषाध्यक्ष नवनीत घडशी, जिल्हा उपाध्यक्ष शरद भोसले, प्रसिद्धीप्रमुख राजेश भागणे, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खांडेकर, नरेश ठोंबरे, तुकाराम काताळे, निलेश कांदेकर आणि संतोष बर्वे आदी पदाधिकारी विशेष प्रयत्न करत आहेत. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी हे आंदोलन निर्णायक ठरेल, असा विश्वास शिक्षक प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.




