GRAMIN SEARCH BANNER

शाळेतील साहित्य चोरी प्रकरणी सागरी पोलिसांची त्वरित कारवाई; १२ तासांत आरोपी अटक, मुद्देमाल  जप्त

Gramin Varta
556 Views

जैतापूर : सागरी पोलीस ठाणे नाटेच्या पथकाने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवत शाळेतील साहित्य चोरी प्रकरणाचा तपास अवघ्या १२ तासांच्या आत उकलला आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून, चोरीस गेलेले ₹७,१०० किंमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि शालेय साहित्य शंभर टक्के हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. ही घटना तुळसुंदे मावळतीवाडी (ता. राजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक ७ ते ८ ऑक्टोबर २०२५ या दरम्यान घडली होती.

याप्रकरणी शाळेचे शिक्षक व फिर्यादी युवराज बबनराव देशमुख (वय ३५) यांनी तक्रार नोंदवली. ७ ऑक्टोबर रोजी शाळा सुटल्यावर फिर्यादींनी सर्व वर्गखोल्या लॉक करून घरी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत आल्यावर त्यांना शाळेच्या आवारातील दोन सीसीटीव्ही कॅमेरे गायब झालेले दिसले, तसेच किचन रुमचे कुलूप तोडून आत ठेवलेले अॅल्युमिनियम पातेले आणि स्टीलचे चमचे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७५/२०२५ बीएनएस कलम ३०५(ड), ३२४(३), ३३१(२) प्रमाणे गुन्हा नोंदवून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोफौ व्ही. बी. चव्हाण, पोहेकॉ वाय. एस. हुजरे, पोहेकॉ इंगळे, पोकॉ कुसाळे, मपोकॉ/एस.आर. बांदकर यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका इसमाची हालचाल संशयास्पद दिसली.

चौकशीअंती संशयित आरोपी मयुरेश महादेव लाकडे (रा. तुळसुंदे मावळतीवाडी, ता. राजापूर) याच्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने शाळेत चोरी केल्याची कबूल दिली. आरोपीच्या कबुलीनंतर, पोलिसांनी २ सीसीटीव्ही कॅमेरे, ६ अॅल्युमिनियम पातेले आणि ३ स्टीलचे चमचे  असा एकूण ₹७,१०० किंमतीचा चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल कायदेशीर पंचनामा करून जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. पुढील तपास पोहेकॉ वाय. एस. हुजरे करीत आहेत. सागरी पोलिसांच्या या झटपट आणि प्रभावी कारवाईमुळे शालेय व्यवस्थापनाने व स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Total Visitor Counter

2648126
Share This Article