कोल्हापूर : नवीन म्हशी घेऊन दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचं स्वप्न उराशी बाळगून, रक्ताचं पाणी करून जमवलेली जमापुंजी मुलाच्या एका चुकीमुळे क्षणात नाहीशी झाल्याची एक अत्यंत हृदयद्रावक घटना कोल्हापुरात घडली आहे.
ऑनलाईन गेमच्या नादात सहावीत शिकणाऱ्या मुलाने वडिलांच्या बँक खात्यातून तब्बल पाच लाख रुपये खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राधानगरी तालुक्यातील एका होतकरू शेतकऱ्याने अत्यंत कष्टाने आपला म्हशींचा गोठा उभा केला होता. या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून संसाराचा गाडा हाकत, भविष्यात हाच व्यवसाय वाढवण्यासाठी पती-पत्नी दोघेही काटकसर करून बँकेत पैसे जमा करत होते. मात्र, त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाला मोबाईलवर ‘फ्री फायर’ हा गेम खेळण्याचा प्रचंड नाद लागला होता. तो अनेक तास वडिलांच्या मोबाईलवर गेम खेळत असे. मुलाच्या या सवयीकडे पालकांचे झालेले दुर्लक्ष त्यांना चांगलेच महागात पडले आहे.
असा उघडकीस आला प्रकार
गोठा वाढवण्यासाठी नवीन म्हशी खरेदी करण्याची वेळ जवळ आल्याने, बँकेत नेमकी किती रक्कम जमा झाली आहे, हे पाहण्यासाठी शेतकरी बँकेत गेले. पासबुक अद्ययावत करताच खात्यातील रक्कम पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. खात्यात केवळ किरकोळ रक्कम शिल्लक होती. घामाघूम झालेल्या शेतकऱ्याने तातडीने बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खात्यातून वेळोवेळी ऑनलाईन व्यवहार झाल्याचे समोर आले.
यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलिसांत धाव घेतली. मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील ट्रान्झॅक्शन आयडीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता, ही सर्व रक्कम ‘फ्री फायर’ या गेमवर खर्च झाल्याचे निष्पन्न झाले. मुलाकडे अधिक चौकशी केली असता, गेम खेळताना नकळतपणे त्याने हे पैसे खर्च केल्याचे उघड झाले.
ही घटना म्हणजे केवळ एका कुटुंबाची आर्थिक हानी नसून, डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्हेगारीचा आणि मुलांच्या हाती मोबाईल देताना पालकांनी घ्यायच्या काळजीचा गंभीर इशारा आहे. कष्टाने कमावलेला पैसा असा मातीमोल झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
धक्कादायक: म्हशी घेण्यासाठी बापाने जमवले ७ लाख; मुलाने ऑनलाईन गेममध्ये उडवले
