GRAMIN SEARCH BANNER

पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट; लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी

Gramin Varta
16 Views

पुणे: पुण्यात एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२ व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली.

या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाने बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र तोपर्यंत एका मुलाचा मृत्यू झाला होता.

१२ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी भीषण आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली होती. या घटनेत बेडरुममध्येच होरपळून एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर दोन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसह पाच जण जखमी झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच अग्निशमन गाड्या आणि एक हायड्रॉलिक शिडी घटनास्थळी पाठवली होती. आग विझवत असतानाच फ्लॅटमधील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे दोन अग्निशमन दलाचे जवान आणि तीन रहिवासी जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

“१२ व्या मजल्यावरील घरातील स्वयंपाकघरातून आग सुरू झाली. त्यानंतर, दोन सिलिंडरचे स्फोट झाले, ज्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करण्यास अडथळा निर्माण झाला. शेजारीही आत अडकलेल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. संपूर्ण फ्लॅटमध्ये फर्निचर होते, ज्यामुळे आगीची तीव्रता खूप जास्त होती. आग संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरली होती. आम्हाला बेडरूममध्ये सुमारे १५ वर्षांचा एक मुलगा मृतावस्थेत आढळला. आम्ही शक्य तितक्या लवकर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीच्या तीव्र उष्णतेमुळे कोणालाही वाचवणे अत्यंत कठीण होते. स्वयंपाकघर फ्लॅटच्या प्रवेशद्वाराजवळ होते आणि आम्ही फ्लॅटमध्ये प्रवेश करताच दुसऱ्या सिलिंडरचा स्फोट झाला,” अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Total Visitor Counter

2650628
Share This Article