चिपळूण : तालुक्यातील पाग पॉवरहाऊसजवळ येथे झालेल्या चारचाकीच्या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तुफान वेगात आलेल्या टाटा मॅन्झा गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. जखमीस उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, याप्रकरणी आरोपी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघाताची फिर्याद सिद्धश प्रमोद भालेकर (वय २४, रा. खंडदळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. अपघातात जखमी झालेले त्यांचे काका संदेश सिताराम भालेकर (वय ५५, रा. चिपळूण) हे १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता चिंचनाक्याहून आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीने (MH-08-AH-5828) कापसाळ येथे घरी जात होते. त्यावेळी पाग पॉवरहाऊसजवळ हायवे क्रॉस करत असताना गोवा बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या टाटा मॅन्झा (MH-12-GK-0846) या वाहनाने त्यांना जोरात धडक दिली.
अपघातात संदेश भालेकर यांना गंभीर दुखापत झाली. टाटा मॅन्झा गाडीचा चालक प्रविण श्रीराम गोळमोडे (वय २१, रा. गुरववाडी, चिपळूण) याने गाडी बेदरकारपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी गुन्हा मॅन्झा गाडीच्या चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
चिपळूणमध्ये चारचाकीची दुचाकीला धडक; एक जखमी
