सचिन यादव / धामणी
गणेशोत्सवानंतर सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मोकळे आकाश आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असे अनुकूल असलेल्या वातावरणाचा त्याचा फायदा उचलत शेतकर्यांनी भातकापणीच्या कामाला सुरवात केली आहे. भात कापणीच्या निमित्ताने दोन दिवसांपासून शेतामध्ये लोकांची लगबग वाढली आहे. सायंकाळी भातझोडणीचा आवाज शेतासह घराच्या अंगणामध्ये घुमत आहेत.
हळव्या भातपिकासह कमी कालावधीचे भातपीक सद्यस्थितीमध्ये कापणी योग्य झाले आहे. गणेशोत्सवानंतर सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे कापणीयोग्य झालेले हे भातपीक जमिनीवर कोसळून आडवे झाले आहे. सातत्यपूर्ण पावसामध्ये जमिनीवर आडवे झालेल्या भातपिकाच्या दाण्यांची पुन्हा रुजवात होवून भातशेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात होती. या चिंतेतून शेतकऱ्यांकडून पावसाच्या जाण्याचा धावा केला जात होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली असून स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. या अनुकूल वातावरणाचा फायदा उचलत शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरवात केली आहे. शेतांमध्ये लोकांची लगबग वाढली आहे.
“परतीच्या पावसाची भीती कायम”
गेले दोन दिवस पाऊस गायब असला तरी, पुन्हा परतीचा पाऊस येण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. त्यामुळे कापणीयोग्य असलेले आणि जमिनीवर आडवे झालेले भात पहिल्यांदा कापणी करण्याला प्राधान्य दिले जात आहे.
कोकणात भात कापणीच्या कामात गुंतला शेतकरी
