GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: डॉ. यतीन जाधव यांची आयएमए महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चेअरमनपदी निवड

Gramin Varta
72 Views

चिपळूण: येथील ख्यातनाम त्वचा व सौंदर्यविकार चिकित्सक डॉ. यतीन जाधव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. आयएमए महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी ही महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली असून, चिपळूणसारख्या शहरातून एका अनुभवी तज्ज्ञाची राज्यस्तरीय पदावर निवड झाल्याने संपूर्ण कोकणातून त्यांचे कौतुक होत आहे.

या समितीत पदसिद्ध सदस्य म्हणून राज्य अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि मानद राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातील डॉक्टर व रुग्णांच्या हितासाठी, तसेच नैसर्गिक किंवा इतर आपत्तींच्या काळात वैद्यकीय यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यासाठी ही समिती कार्य करणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच समितीची बैठक घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

डॉ. यतीन जाधव हे कोकणातील सुप्रसिद्ध ‘स्प्रिंग क्लिनिक’चे संचालक आणि ‘अपरांत मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे मुख्य प्रवर्तक म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत आहेत. औद्योगिक स्वास्थ्य क्षेत्रातील सखोल जाणकार आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वी त्यांनी आयएमए महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक स्वास्थ्य समितीचे अध्यक्षपद व समन्वयक पद यशस्वीपणे भूषविले असून, कोरोना काळात त्यांनी टास्क फोर्सचे कोकण विभाग समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा आलेखही मोठा आहे. कोकणच्या सांस्कृतिक इतिहासाचा मानदंड असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. याशिवाय श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, चिपळूण तालुका खो-खो असोसिएशन आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत. सांज सोबत, एकता विकास मंच आणि आपलं चिपळूण यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. एका बहुआयामी आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्वाची राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Total Visitor Counter

3209987
Share This Article