GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: ‘भोपळा का नेतोस?’ असे विचारल्याच्या रागातून कळंबुशी येथे घरात घुसून वृद्धेला बेदम मारहाण

Gramin Varta
530 Views


संगमेश्वर: तालुक्यातील कळंबुशी म्हापालेवाडी येथे एका भोपळ्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले आहे. एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संतापलेल्या तरुणाने घरात घुसून ७२ वर्षीय वृद्ध महिलेला जोराची धक्काबुक्की करत जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात सुधीर विष्णू दिवाळे (वय ४२, रा. कळंबुशी) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंगळवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास साक्षीदार प्रकाश म्हापाले यांच्या घरातील भोपळा आरोपी सुधीर दिवाळे हा घेऊन जात होता. यावेळी ‘भोपळा का नेतोस?’ अशी साधी विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, तेथे हजर असलेल्या फिर्यादी सानिका सचिन दिवाळे (वय ३५) यांना ‘तुम्हाला बघून घेतो, सुरा आणून एकेकाला भोसकेन’ अशी जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली.

या वादाचा वचपा काढण्यासाठी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. ‘तुझा पती सचिन कोठे आहे, त्याला बघतो’ असे ओरडत तो घरात धुमाकूळ घालू लागला. यावेळी त्याला रोखण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिला सुनिता दत्ताराम दिवाळे यांना आरोपीने जोरात ढकलून दिले. या धक्काबुक्कीत सुनिता दिवाळे जमिनीवर पडल्याने त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी सानिका दिवाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक १९/२०२६ नुसार आरोपीविरुद्ध गृह अतिक्रमण, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3376911
Share This Article