GRAMIN SEARCH BANNER

डिंगणी येथील सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी; अपघाताचा धोका वाढला

Gramin Varta
192 Views

संगमेश्वर /एजाज पटेल

डिंगणी येथील सीएनजी पंपाच्या ठिकाणी गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी कोणतीही स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालकांना आपली वाहने थेट मुख्य रस्त्यावर वेडेवाकड्या पद्धतीने उभी करावी लागत आहेत. परिणामी या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांना मार्ग काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

विशेष म्हणजे सीएनजी वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांसाठीही पंप परिसरात स्वतंत्र पार्किंग अथवा थांबा व्यवस्था नसल्याने या गाड्याही रस्त्याच्याकडेला तासन्‌तास उभ्या करण्यात येत आहेत. आधीच हा रस्ता वाहतूक दृष्टीने अरुंद असून त्यात अनेक ठिकाणी वळणे आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे समोरून येणारी वाहने किंवा वळणावरील रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

रविवारी सायंकाळी याच कारणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सीएनजी भरण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांमुळे एसटी बसेस तसेच अन्य खासगी वाहने कोंडीत अडकून पडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मोटार वाहन कायदा तसेच सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीसंबंधी नियमांनुसार मुख्य रस्त्यावर बेकायदेशीररीत्या वाहने उभी करणे हे नियमबाह्य असून ते सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण मानले जाते. मात्र येथे कोणतीही योग्य व्यवस्था न करता रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने शासनाच्या रस्त्यावर अप्रत्यक्षपणे अतिक्रमण होत असल्याचा आरोप वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.या गैरसोयीमुळे यापूर्वी वाहनचालकांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सातत्याने  उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेक वेळा वाहनचालक व नागरिकांनी सीएनजी पंप व्यवस्थापनाकडे तक्रारी व विनंत्या केल्या असल्या तरी आजपर्यंत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. वाहतूक सुरळीत ठेवणे व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पंप व्यवस्थापनासह संबंधित प्रशासनाचीही आहे. सीएनजी पंप सुरू करताना आवश्यक पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियंत्रण व सुरक्षिततेचे निकष पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत आहे.

या गंभीर बाबीकडे पोलीस, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांनी तातडीने लक्ष देऊन योग्य पार्किंग व्यवस्था निर्माण करावी, अन्यथा भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Total Visitor Counter

3072293
Share This Article