GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: कादवड धनगरवाडीत दारूच्या नशेत मित्रावर हल्ला

Gramin Varta
4 Views

चिपळूण : तालुक्यातील कादवड धनगरवाडी येथे १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास किरकोळ वादातून एका युवकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या मित्रानेच हा हल्ला केला असून, यामध्ये सुनील बबन ढवळे (वय २९) हा युवक जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी फिर्यादी सुनील ढवळे आणि काही साक्षीदार त्यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत उभे होते. त्याचवेळी आरोपी अशोक बाबा शिंगाडे (वय २६, रा. कादवड धनगरवाडी) हातात बॅटरी आणि काठी घेऊन दारूच्या नशेत तेथे आला. त्याने सुनीलच्या लहान भाऊ बाबा याला आपल्या वाडीतील पऱ्ह्यात खेकडे पकडण्यासाठी सोबत चल, असे बोलणे सुरू केले.

आरोपी दारूच्या नशेत असल्यामुळे सुनीलने आपला भाऊ बाबा याला रात्रीच्या वेळी त्याच्यासोबत खेकडे पकडण्यासाठी जाण्यास मनाई केली. याचा राग आरोपी अशोक शिंगाडे याला आला. रागाच्या भरात त्याने आपल्या हातात असलेल्या ‘मानग्याची काठी’ सुनीलच्या डाव्या पायाच्या मांडीवर मारली. यानंतर त्याने आपल्या हातात असलेल्या बॅटरीचा उजेड सुनीलच्या तोंडावर मारला. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने तेथेच असलेले दोन दगड उचलून सुनीलच्या तोंडावर फेकून मारले. या हल्ल्यात सुनील ढवळे यांच्या हनुवटीला आणि कानाला दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर जखमी सुनील बबन ढवळे यांनी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी अशोक शिंगाडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ११८(१), १२५, १२५(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक ६७/२०२५ दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2669165
Share This Article