मुंबई : वाजत-गाजत निघालेली लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक चौपाटीवर रखडली. भरतीमुळे गणेशमूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर चढविताना अडचण निर्माण झाली. त्यामुळे तब्बल ३३ तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.
शनिवारी दुपारी १२ वाजता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीला आरंभ झाला. रविवारी सकाळी साडेसात वाजता गिरगाव चौपाटीवर ही मिरवणूक दाखल झाली. मात्र समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती असल्यामुळे लालबागच्या राजाची मूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या. चौपाटीवरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर कोळी बांधवांच्या साथीने सायंकाळी सहा ते साडे वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची गणेशमूर्ती ट्रॉलीवरून अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यात यश आले. अखेर रविवारी रात्री ९.१० वाजता विसर्जन करण्यात आले.
समाजमाध्यमांवर चर्चा
अत्याधुनिक स्वयंचलित तराफा आणूनही लालबागच्या राजाच्या विसर्जनाला विलंब झाल्यामुळे समाजमाध्यमांवर नागरिकांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. तसेच गणेशोत्सव काळात सर्वसामान्य भक्तांना धक्काबुक्की करीत रांगेत तासनतास उभे करणाऱ्या आणि तारांकित मंडळींसाठी पायघड्या घालणाऱ्या मंडळाला लालबागच्या राजाने विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर ताटकळत उभे केले, अशी खोचक टीकाही केली.